गृहमंत्री राजनाथ सिंहांविरोधात समाजवादी पक्षाची शत्रुघ्न सिन्हाची पत्नी पूनम सिन्हांना उमेदवारी

0
496

लखनऊ, दि. १६ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी पूनम यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला असून सपाने त्यांना लखनऊ मतदारसंघातून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. पूनम यांच्या उमेदवारीची लगेचच घोषणा करण्यात आली.

सपा नेता डिंपल यादव यांच्या उपस्थितीत पूनम सिन्हा यांनी आज सपाचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. त्यानंतर सपाचे ज्येष्ठ नेते रविदास मेहरोत्रा यांनी पूनम यांची उमेदवारी जाहीर करतानाच राजनाथ सिंह यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने लखनऊमधून उमेदवार देऊ नये, असे आवाहन केले.

पूनम सिन्हा १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. विशेष म्हणजे पूनम यांचे पती शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपला रामराम करून गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पाटणा साहिब मतदारसंघातूनच ते पुन्हा एकदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर पूनम यांना लखनऊमध्ये काँग्रेसचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असून तसं झाल्यास लखनऊमधील समीकरणं बदलू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. लखनऊमध्ये तीन ते साडेतीन लाख कायस्थ मते आहेत. त्याशिवाय सव्वालाखाच्या आसपास सिंधी मते आहेत. यामुळेच सपाने पूनम सिन्हा यांना लखनऊच्या आखाड्यात उतरवण्याची चाल खेळल्याचे बोलले जात आहे. पूनम या सिंधी आहेत.