Banner News

गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त; रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात  

By PCB Author

February 07, 2019

नवी दिल्ली, दि. ७ (पीसीबी) – रिझर्व्ह बँकेचे द्वैमासिक पतधोरण आज (गुरूवार) जाहीर करण्यात आले. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो दरात ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे रेपो दर ६.२५ टक्के, तर रिव्हर्स रेपो दर ६ टक्के झाल्याने गृहकर्ज आणि वाहन कर्जांचे दर कमी होतील, असे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीत सांगितले. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सर्वसामान्य जनतेला सर्व प्रकारची कर्जे स्वस्त मिळणार आहेत. तसेच सध्याच्या कर्जांवरील व्याजदरही कमी होणार असल्याने बँकेचा हप्ता कमी होण्यास मदत होणार आहे.  यंदाच्या २०१९-२०च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर हा ७.४ राहण्याची शक्यता आरबीआयने व्यक्त केली आहे. तसेच  महागाईचा दर ३.२ टक्के राहण्याची शक्यता  आहे. पहिल्या सहामाहित हा दर ते ३.४ आणि तिमाहित ३.९ टक्के दर राहण्याची शक्यता आहे.

२०१९- २० मध्ये देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दर ७.४ टक्के राहण्याची  शक्यता आहे. तर महागाईचा दर २०१९-२० मध्ये पहिल्या तिमाहीत ३.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ३.४ टक्के आणि तिसऱ्या तिमाहीत ३.८ टक्के असा असेल.  शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या कर्जमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता हमीविना शेतकऱ्यांना १.६० लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. आधी ही मर्यादा १ लाखापर्यत होती.

दरम्यान, गव्हर्नरपदी विराजमान झाल्यानंतर शक्तीकांत दास यांची पतधोरण समितीची ही पहिलीच बैठक झाली. २८ जानेवारी रोजी सरकारी बँकांसोबत झालेल्या बैठकीत दास यांनी व्याज दर कमी करण्याचे संकेत दिले होते.