गूगल पे द्वारे पैसे पाठवण्यास सांगत पाऊण लाखाची फसवणूक

0
402

सांगवी, दि. १६ (पीसीबी)-फ्लॅट भाड्याने घेण्याचे सांगत गूगल पेवर पैसे पाठवण्यास सांगून दोघांनी एका महिलेची पाऊण लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 14 जानेवारी रोजी दुपारी साडेतीन ते रात्री आठ वाजताच्या कालावधीत सांगवी परिसरात घडली.

याप्रकरणी 54 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रनदीप सिंग, गुगल पे युजर हिरा प्रसाद सिंग (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला १४ जानेवारी रोजी दुपारी फोन केला. फिर्यादी यांचा फ्लॅट आरोपींना भाड्याने हवा असल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादीला काही रक्कम गुगल पेवर पाठवण्यास आरोपींनी सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांच्या गूगल पे द्वारे 74 हजार 996 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील तांबे तपास करीत आहेत.