Desh

गुवाहाटी बॉम्बस्फोटाप्रकरणी टीव्ही अभिनेत्रीसह तिच्या साथीदाराला अटक

By PCB Author

May 17, 2019

गुवाहाटी, दि. १७ (पीसीबी) – गुवाहाटीतील बॉम्बस्फोटाप्रकरणी पोलिसांनी टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीसह तिच्या साथीदाराला अटक केली आहे.

जान्हवी साइकिया आणि प्रनॉमॉय राजगुरु अशी या आरोपींची नावे असून ते दोघेही युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

गुवाहाटीत एका शॉपिंग मॉलसमोर आणि शहराच्या मध्य भागातील बागेसमोर बुधवारी संध्याकाळी बॉम्बस्फोट झाला होता. ग्रेनेड फेकून हे स्फोट घडवण्यात आले होते. मोटारसायकलवरून आलेल्या दोन इसमांनी हे स्फोट घडवले होते. या स्फोटात ११ जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा गुवाहाटी पोलिसांनी तपास करुन जान्हवी साइकिया आणि प्रनॉमॉय राजगुरु या दोघांना अटक केली.

दरम्यान गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुवाहाटीतील बाघोरबारी येथे एका घरावर पोलिसांनी छापा टाकला. हे घर राजगुरु आणि जान्हवी या दोघांनी भाड्याने घेतले होते. घरातून स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले. यात २० किलो गनपावडर, बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे अन्य साहित्य, ९ एमएम पिस्तूल आणि ‘उल्फा’शी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे.