Pune

गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी २ लाखांची लाच मागणाऱ्या पोलिसांना अटक

By PCB Author

July 24, 2019

पुणे, दि. २४ (पीसीबी) – फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पती-पत्नीकडे २ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या खडक पोलिस ठाण्यातील दोन पोलिस नाईकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

उमेश दत्तात्रय मानकर (वय ४१) आणि शरद अर्जुन पवार (वय ३१) असे अटक करण्यात आलेल्या दोघा पोलिस नाईकांची नावे आहेत.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक झाल्याचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदार पती-पत्नीला आरोपी न करण्यासाठी आरोपी पोलीस नाईक उमेश आणि शरद या दोघांनी त्यांच्याकडे २ लाख रुपयांची मागणी केली होती. याबाबत संबंधीत पती-पत्नीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी घटनेची पडताळणी करुन उमेश आणि शरद या दोघांना अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक नितीन भोयर अधिक तपास करत आहेत.