गुन्हेगारी थोपविण्यासाठी ‘ऑपरेशन ऑल आऊट’; सुमारे १५० जणांवर कारवाई

0
852

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. त्यातच नव्याने बदलून आलेले अधिकारी, कर्मचारी यांना हद्दीची अजूनही पुरेशी माहिती नसल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. शहरात वाहनांची तोडफोड सत्र हे पोलिसांनी नाचकती आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून १५ दिवसांच्या फरकाने लगेच दुसरे ऑपरेशन ऑल आऊल घेण्यात आले. यामध्ये सुमारे १५० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम शुक्रवारी (दि. १३) रात्री नऊ ते रात्री अकरा वाजेपर्यंत परिमंडळ तीनच्या हद्दीत राबविण्यात आली.

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमध्ये पोलिस उपआयुक्त गणेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन ऑलआऊल राबविण्यात आले. या मोहिमेत तडीपार, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, रेकॉर्डवरील, फरार, दुकानाबाहेर दारू पिणारे, वेगात वाहन चालवणाऱ्या अशा वेगवेगळ्या गुन्ह्यातील सुमारे १५० गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि फरार गुन्हेगारांचा शोध घेत मैदाने आणि मोकळ्या जागेत विनाकारण जमाव करून थांबणाऱ्या मुलांच्या टोळ्या, वेगात गाडी चालवणाऱ्यांना तपासण्यात आले.

परवानाधारक दारूच्या दुकानाबाहेर ऊभा राहून दारू पिणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. मोहिमेसाठी शहरातील काही भाग निश्चित करण्यात आला. त्या भागामध्ये जाऊन पोलिसांनी ही मोहिम राबविली. पकडण्यात आलेल्या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.