गुडन्यूज… भारतीय वंशाचे ऋषी सुनक यूकेचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता….

0
268

लंडन, दि. १७ (पीसीबी) : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या वर्षी प्रिन्स फिलिप यांच्या अंत्यसंस्काराच्या पूर्वसंध्येला जॉन्सन यांच्या कर्मचाऱ्यांनी पार्टी केली होती. लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या डाउनिंग हाऊस निवासस्थानाच्या गार्डनमध्ये पार्टी केल्याच्या वृत्तावरून वाढत्या संतापाच्या पार्श्वभूमीवर जॉन्सनने बुधवारी ब्रिटनची संसद हाऊस ऑफ कॉमन्समध्ये माफीही मागितली आहे. मात्र, हे प्रकरण आता इतके गंभीर झाले आहे की आता त्यांच्या पक्षाच्या खासदारांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली आहे. कारण, हे प्रकरण असंवेदनशीलतेचा कळस असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या अडचणी वाढत आहेत. 2020 मध्ये, कोरोना महामारीच्या काळात लादलेल्या लॉकडाऊनमध्ये गार्डन ऑफ डाऊनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी करण्यासाठी त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होत आहे. विरोधी पक्षाकडून जॉन्सन यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे अशी मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमधील आघाडीची सट्टा कंपनी ‘बेटफेअर’ने दावा केला आहे की, अडचणीत आलेले बोरिस जॉन्सन लवकरच पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार आहेत. यानंतर त्यांची जागा भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांची पंतप्रधान पदी वर्णी लागू शकते.
बेटफेअरने म्हटले आहे की, ”57 वर्षीय जॉन्सन यांनी कोविड दरम्यान पंतप्रधान कार्यालय डाउनिंग स्ट्रीट येथे आयोजित केलेल्या ड्रिंक पार्टीच्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर केवळ विरोधी पक्षांच्या वतीनेच नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या वतीनेही राजीनामा देण्याची मागणी होत आहे. ‘बेटफेअर’चे सॅम रॉसबॉटम यांनी ‘वेल्स ऑनलाईन’ला सांगितले की, जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यास ऋषी सुनक हे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लिझ ट्रस (परराष्ट्र मंत्री) आणि त्यानंतर मायकेल गोव्ह (कॅबिनेट मंत्री) यांचा क्रमांक आहे. दरम्यान, या शर्यतीत माजी परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट, भारतीय वंशाच्या गृहमंत्री प्रिती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जाविद आणि कॅबिनेट मंत्री ऑलिव्हर डाउडेन यांचाही समावेश आहे.