Desh

गुजराथ एटीएस ची मोठी कारवाई

By PCB Author

July 12, 2022

अहमदाबाद, दि. १२ (पीसीबी) : गुजरात एटीएसने मोठी कारवाई करत कच्छ जिल्ह्यातील मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ्यांची मोठी खेप जप्त केली आहे. ही खेप मध्यपूर्वेतून भारतात आणण्यात येत होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यापूर्वी सीमा सुरक्षा दलाने चार पाकिस्तानी मच्छिमारांना अटक करत गुजरातच्या किनार्‍याजवळून 10 मासेमारी नौका जप्त केल्या होत्या. त्यानंतर आज ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या जहाजामधून प्रामुख्याने हेरॉईन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. याची बाजारपेठेतील नेमकी किंमत किती आहे याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

सप्टेंबर 2021 मध्ये, मुंद्रा बंदरावर देशातील अंमली पदार्थांची सर्वात मोठी कारवाई करत 21,000 कोटी किमतीची 3,000 किलो वजनाची ड्रग्सची खेप जप्त करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण दहशतवादी वित्तपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आले होते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदलाने केलेल्या संयुक्त कारवाईत गुजरातच्या किनारपट्टीवरील एका जहाजातून 2,000 कोटींहून अधिक किमतीचे 750 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात, नऊ पाकिस्तानी नागरिकांना गुजरात एटीएसने, भारतीय तटरक्षक दलाच्या संयुक्त कारवाईत 280 कोटी किमतीच्या हेरॉईनची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती