गुजरात हिंसाचार: उत्तर प्रदेशचे लोक काही विदेशी नाहीत – मायावती

0
515

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसपा प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांवर गुजरातमध्ये होत असलेल्या हल्ल्यांवरुन सुरु असलेले राजकारण बंद करण्याचे अपील केले आहे. उत्तर प्रदेशचे लोक काही विदेशी नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर हल्ले करणाऱ्यांवर गुजरात सरकारने कडक कारवाई केली पाहिजे अशी मागणी मायावती  यांनी केली.

इथे एक-दुसऱ्यांवर आरोप करण्याचा कोणता मुद्दा नाही. उत्तर भारतीय विदेशी नाहीत. ते आपल्याच देशाचे नागरिक आहेत. याप्रकरणी राजकारण करण्यापेक्षा गुजरात सरकारला आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याचे आवाहन करते, असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. साबरकंठा जिल्ह्यात १४ वर्षीय मुलीवर बलात्कारप्रकरणी बिहारच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर स्थानिक लोकांनी बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांना लक्ष्य केले. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांनी गुजरात सोडण्यास सुरुवात केली होती.

यावर मायावती म्हणाल्या की, वाराणसीच्या लोकांनी मोदींना मतदान केले, ही अत्यंत दु:खद गोष्ट आहे. त्यांना गुजरातमध्ये लक्ष्य केले जात आहे. या हल्ल्यासाठी जे जबाबदार आहेत, त्यांच्याविरोधात गुजरातमधील भाजपा सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे. गुजरातमध्ये हिंदी भाषिक प्रवाशांवर हल्ले झाल्यानंतर होत असलेले पलायन पाहता राज्य सरकारने औद्योगिक वसाहतीत अतिरिक्त सुरक्षा पुरवली आहे. यादरम्यान राज्य सरकारनेही या लोकांना परत येण्याचे आवाहन केले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी लोकांना हिंसेत सहभागी न होण्याचे अपील केले आहे. या हल्ल्याप्रकरणी ४३१ लोकांना अटक केल्याचे सांगितले. सध्या गुजरातमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे, असेही त्यांनी सांगितले.