Maharashtra

गुजरात मधून आलेल्या वृध्दामुळे कोयनानगरात कोरोना

By PCB Author

May 20, 2020

कोयनानगर, दि. २१ (पीसीबी) : कोरोना महामारीने जगभरात धुमाकूळ घातला आहे. या संसर्गजन्य रोगाचे लोण आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील कोयना विभागापर्यंत नव्हते. आतापर्यंत कोरोनामुक्त असणारा कोयना विभागाला घर वापसी करणाऱ्या लोकांमुळे प्रसाद मिळाला आहे. कोयना विभागातील शिरळ या गावात सहा दिवसापुर्वी अहमदाबाद वरून आलेल्या कुटुंबातील ७० वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला कोरोनाची लागण झाली आहे.

या बाधित झालेल्या रुग्णाला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. खोकला , ताप व श्वसन त्रास असलेला या रुग्णाला मधुमेह आहे. मंगळवारी (दि 19) हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेवुन या रुग्णाने पाटण येथील बर्गे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल झाला. या रुग्णाला कोरोनाची लक्षणे आढळून आल्यामुळे बर्गे हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने या रुग्णाला पाटण ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. पाटण ग्रामीण रूग्णालयातून या रुग्णाला कराड येथील कृष्णा रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

अहमदाबाद वरून आपल्या कुटुंबातील 4 लोकांबरोबर हा वयोवृद्ध रुग्ण आपल्या घरी आला आहे. कोयना विभागात घर वापसी करणाऱ्याची संख्या 7,460 आहे. या घटनेमुळे पाटण तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला असून गावकर्यत घबराट आहे.