गुजरात: ब्राह्मणांना आरक्षण द्या; ओबीसी आयोगाकडे मागणी

0
545

गांधीनगर, दि. ३० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्यानंतर त्याचे पडसाद गुजरातमध्येही उमटू लागले आहेत. पाटीदारानंतर तेथील ब्राम्हण आणि राजपूत समाजानेही आरक्षणाची मागणी केली आहे. ब्राम्हण समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ओबीसी आयोगाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता गुजरातमध्येही पुन्हा आरक्षणासाठी आंदोलने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

समस्त गुजरात ब्राम्हण समाजाने ओबीसी आयोगाला आरक्षणाच्या मागणीचे पत्र पाठवले आहे. ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावे, त्यासाठी सर्व्हे केला जावा, असे त्यांचे म्हणणे आहे. गुजरातमध्ये ६० लाख ब्राह्मण आहेत. हा आकडा एकूण लोकसंख्येपैकी ९.५ टक्के आहे. ४२ लाख ब्राह्मण हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. त्यानुसार, गुजरात सरकारने सर्व्हे करून ब्राह्मणांना आरक्षण द्यावे, अशी मागणी समाजाचे प्रमुख यज्ञेश दवे यांनी केली आहे.

दुसरीकडे, राजपूत गारसिया समाज संघटनेच्या नेत्यांनीही ओबीसी आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली. राजपूत समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे नेते राजन चावडा यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. राजपुतांना नोकरी आणि शिक्षणामध्ये समान संधी दिली जात नाही. त्यांना मुख्यतः शेतीवरच अवलंबून राहावे लागत आहे. इतर समाजांशी तुलना केल्यास आमच्या समाजातील कमावणाऱ्या महिलांची संख्या खूपच कमी आहे. त्यामुळे ओबीसी कोट्यातून आम्हाला आरक्षण देण्यात यावे. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी आमच्या समाजाची लोकसंख्या ८ टक्के आहे. त्यानुसार आम्हाला आरक्षण मिळावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.