Desh

गुजरातमध्ये भाषणादरम्यान हार्दिक पटेलला एकाने लगावली थप्पड; कार्यकर्त्यांकडून संबंधिताला चोप

By PCB Author

April 19, 2019

अहमदाबाद, दि. १९ (पीसीबी) – भाजप प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांच्यावर पत्रकार परिषदेत बूटफेक झाल्याची घटना ताजी असतानाच, भर प्रचारसभेत भाषण सुरू असताना एका अनोळखी व्यक्तीनं काँग्रेस नेता हार्दिक पटेलच्या श्रीमुखात भडकावल्याची घटना घडली आहे. गुजरातमधील सुरेंद्र नगरातील बढवान येथे हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. हार्दिकला थप्पड लगावणाऱ्या व्यक्तीला उपस्थित कार्यकर्त्यांनी चोप दिला. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याची कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.

हार्दिक पटेलला थप्पड लगावल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हार्दिक प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करत होता. त्यावेळी एक व्यक्ती व्यासपीठावर आली आणि हार्दिकच्या कानशिलात भडकावली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळं व्यासपीठावर काही वेळ गोंधळ उडाला. तिथे उपस्थित समर्थक आणि कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला चोप दिला. त्या व्यक्तीच्या अंगावरचे कपडेही फाडले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्याची सुटका केली आणि रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.