Desh

गुजरातमध्ये जवळपास १ कोटी रुपयांच्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा जप्त

By PCB Author

September 24, 2020

गुजरात,दि.२४(पीसीबी) – गुजरात एटीएसनं गांधीनगर येथून एक हजार व पाचशेच्या या ११ हजार ९९ नोटा जप्त केल्या असून त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख म्हणजे जवळपास एक कोटी रुपये आहे.

गुजरात एटीएसनं कारवाईनंतर घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. आरोपी मनिष संघांनी (पटेल, वय ४२) हा मोरबी जिल्ह्यातील हळवद तालुक्यातील घनश्यामगढ येथील रहिवाशी आहे. आरोपी संघांनी याच्या कारमध्ये या नोटा सापडल्या आहेत. गांधीनगरमधील सेक्टर २८मध्ये एटीएसनं ही कार पकडली. त्यानंतर तपासणी केली असता, त्यात चलनातून बाद करण्यात आलेल्या एक हजार व पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. तब्बल ११ हजार ९९ नोटा असून, त्यांचं एकूण मूल्य ९९.४ लाख रुपये इतकं आहे.

दरम्यान यापूर्वी जुलै महिन्यात एटीएसनं अशीच एक कारवाई केली होती. २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या कारवाईत एटीएसनं दोन जणांना अटक केली होती. तसेच त्यांच्याकडून ४ कोटी ७६ लाख रुपये मूल्य असलेल्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. गोंध्रातील पंचमहलमध्ये ही कारवाई करण्यात आली होती.