“गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा मुंबईत येऊन व्हायब्रंट गुजरातसाठी रोड शो करणं भाजपला चालतं का?”

0
245

मुंबई, दि.०२ (पीसीबी) : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार टीका केली होती. ममता बॅनर्जी महाराष्ट्रातील उद्योग पळवून नेण्यासाठी तर आल्या नाहीत ना? असा सवाल शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले आहेत. व्हायब्रंट गुजरातसाठी ते रोड शो करत आहेत. भाजपला हे चालतं का? असा सवाल संजय राऊत यांनी शेलार यांना केला आहे. संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. भाजपच्या आरोप-प्रत्यारोपाला काही अर्थ नाही. हा पोटशूळ आहे. विरोधकांच्या पोटात दुखू लागलं आहे. ममता बॅनर्जी आल्या. उद्योगपतींना भेटल्या. मुंबई औद्योगिक नगरी आहे. या उद्योगपतींचे देशभरात उद्योग आहेत. ते सगळीकडे उद्योग करतात. ममतांनी म्हटलं कोलकात्यातही लक्ष द्या. त्यात चुकलं काय? असा सवाल राऊत यांनी केला.

ममता बॅनर्जी या काय मुंबई लुटायला, ओरबडायला आल्या आहेत का? ममता बॅनर्जी मुंबई लुटायला आल्या असं जे म्हणत आहेत ते मूर्ख लोकं आहेत. माझा प्रश्न आहे की आज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे अर्ध मंत्रिमंडळ घेऊन मुंबईत आले. व्हाटब्रंट गुजरातसाठी ते मुंबईत आले. व्हायब्रंट गुजरात तिकडे. मुंबईत काय कशासाठी? व्हायब्रंट गुजरातसाठी मुंबईत रोड शो करता, उद्योगपतींना आकर्षित करता ते चालतं का? यालाच मी लूट म्हणतो, असं ते म्हणाले. भाजपला आरोप करू द्या. त्यांना आरोपांचे जुलाब होत आहेत. त्यांना आरोपांचा डायरीया झाला आहे. त्यांना तोंडाचा डायरीया झाला आहे. दुर्गंधी काही काळ निर्माण करतात. त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा हल्लाही त्यांनी चढवला.

मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला पळवले. आंतरराष्ट्रीय फायनान्स सेंटर गुजरातला गेलं तेव्हा हे लोकं का गप्प बसले? डायमंड प्रकल्पासह अनेक प्रकल्प मुंबईतून गुजरातला गेले. त्यावेळच्या गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल महाराष्ट्रात आल्या होत्या. मुंबईत काय ठेवलं गुजरातला चला असं त्या म्हणाल्या होत्या. ही ओरबाडण्याची भाषा आहे. ममता बॅनर्जी प्रेमाने आल्या. आम्हाला भेटल्या ही पोटदुखी आहे. योगी आदित्यनाथ इथे आले. सिने उद्योग लखनऊला नेणार म्हटले. तेव्हा का यांना मिरच्या झोंबल्या नाही? हे ढोंग बंद करा नाही तर तुमच्या ढोंगावर लोकं लाथा मारतील, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. या क्षणी कोणतीही आघाडी सक्रिय दिसत नाही. यूपीए दिसत नाही. एनडीएही नाही. एनडीए तर संपलेली आहे. शरद पवार आणि ममता बॅनर्जी काही करत असेल तर आम्ही त्याकडे डोळसपणे पाहतो. हे अनुभवी लोकं आहेत. काय करायचं आणि काय नाही हे त्यांना माहीत आहे. नेता कोण हा विषय नाही. तर समर्थ पर्याय देणं हे महत्त्वाचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.