Banner News

गुगलचा नारीशक्तीला सलाम; डुडलवर १४ देशातील महिला, १४ भाषा आणि १४ विचार

By PCB Author

March 08, 2019

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – जगभरात ८ मार्च यादिवशी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रांत गगनभरारी घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. हे महत्त्व अधोरेखित करताना गुगलनेही खास डुडल तयार करून स्त्री शक्तीला सलाम केला आहे.

जागतिक महिला दिनानिमित्त गुगलने विशेष डुडल तयार केले आहे. या डुडलमध्ये जगभरातील चौदा प्रभावी महिलांच्या विचारांचा समावेश आहे. डुडलच्या प्रत्येक स्लाइडवर जगभरातील विवध महिलांचे विचार मांडण्यात आले आहेत. हे विचार प्रत्येक महिलांना प्रेरणा देणारे असेच आहेत.

भारत, जपान, अमेरिका, मॅक्सिको, जर्मनी, ब्राझील, रशिया या देशामधल्या विविध क्षेत्रात आपल्या कामाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा समावेश डुडलमध्ये करण्यात आला आहे. लेखक, कवयित्री, अंतराळवीर, डॉक्टर, खेळाडू अशा विविध महिलांचे प्रभावी विचार अतिशय नेमकेपणाने डुडलमधून मांडण्यात आले आहेत.