Pimpri

गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक

By PCB Author

July 12, 2022

तळेगाव दाभाडे, दि. १२ (पीसीबी) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला देतो, असे वकिलाला आमिष दाखवून त्यांच्याकडून २० लाख रुपये घेतले. त्यातील सात लाख ४९ हजार रुपये परत करून आरोपी सर्व ऑफिसेस बंद करून दुबई व इतरत्र परागंदा झाले. हा प्रकार १० डिसेंबर २०२० ते ११ जुलै २०२२ या कालावधीत तळेगाव दाभाडे येथे घडला.

ज्ञानेश्वर सीताराम कराळे (वय ५४, रा. देहूगाव) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल गुलाबसिंग जाखड (वय ४५, रा. चिंचवड), दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जे बी सी ऍग्रोटेक कंपनीचे संचालक राहुल जाखड यांनी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे आश्वासन दिले. त्याप्रमाणे फिर्यादी ज्ञानेश्वर यांच्यासोबत लेखी अॅग्रीमेंट केले. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी यांनी २० लाख रुपये गुंतवणूक केली. त्यांनतर त्या रकमेचा परतावा म्हणून आरोपीने फिर्यादी यांना ३४ लाख ८५ हजार रुपयांचे चेक दिले. परताव्याचे फक्त सात लाख ४९ हजार रुपये देऊन आरोपी पुण्यातील कंपनीची ऑफिसेस बंद केली. राहुल जाखड आणि त्यांची पत्नी दुबई व इतरत्र परागंदा झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.