गुंडांच्या दहशतीला कंटाळलेल्या चिखली घरकुल वासीयांचे रात्री उशीरा पोलीस आयुक्तालया समोर आंदोलन

0
561

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – चिखली घरकुल येथे दिवसेनदिवस टोळक्यांच्या वाढत चाललेल्या दहशदीला कंटाळलेल्या स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने शनिवारी (दि.१६) रात्री उशीरा प्रेमलोक पार्क येथील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालया समोर आंदोलन केले.

चिखली घरकुल प्रकल्पातील एका दुकानदाराने हप्ता देण्यास नकार दिल्याने शनिवारी रात्री काही स्थानिक गुंडांच्या टोळीने दुकानाची तोडफोड केली. मागील काही दिवसांपासून येथे स्थानिक गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. काही दिवसांपूर्वीच येथील आक्या बॉड नावाच्या एका अल्पवयीन गुन्हेगाराने नागरिकांच्या नाकीनऊ आणले होते. तर पोलिसांच्या नाकात देखील त्याने दम भरला होता. चिखली परिसरात बऱ्याच प्रमाणात अवैधधंदे असल्याने अनेक गुंडांचा या ठिकाणी सतत वावर असतो. यामुळे येथे एक टोळी देखील सक्रीय झाल्याची माहिती समोर येत आहे.

हे गुंड स्थानिकांना हप्ता मागतात, दमदाटी करतात आणि महिला आणि मुलींची छेड काढतात. पोलिस देखील या गुंडांवर किरकोळ स्वरुपाची कारवाई करुन सोडून देतात असे नागरिकांचे म्हणने आहे. शनिवारी रात्री चिखली घरकुल येथील त्रासलेल्या नागरिकांनी थेट पोलीस आयुक्तालय गाटत आयुक्तालयाच्या गेटसमोर आंदोलन करुन गुंडांवर त्वरीत कडक कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली. यावर पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी गुंडांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशीरा हे आंदोलन मागे घेतली. आता पोलिस येथील गुंडांवार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.