Maharashtra

“गीतेंच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही”; पवारांवरील टीकेमुळे तटकरेंची आगपाखड

By PCB Author

September 21, 2021

मुंबई, दि.२१ (पीसीबी) : शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन सुनील तटकरेंनी शेलक्या शब्दात अनंत गीते यांचा समाचार गेतला.

“अनंत गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. अनंत गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत, ते अडगळीत पडले आहेत. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. राज्याला, देशाला पवार साहेबांचं काम माहिती आहे. गीते यांची अवस्था आता सांगताही येत‌ नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.  उद्धव ठाकरे यांचं कामाचं कौतुक होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांकडून काही वक्तव्य येत आहेत. गीतेंची टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यांच्या विधानाला महत्व देण्याचं कारण नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळा होता. यावेळी अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत भाष्य केलं. मी शिवसेनेचा नेता म्हणून बोलतोय. शिवसेना काय आहे हेच फक्त सांगणार आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्यमंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील. तुमची-माझी जबाबदारी गाव सांभाळायची आहे. आपलं गाव सांभाळात असताना आघाडीचा विचार करायचा नाही. आम्हाला फक्त शिवसेनेचा विचार करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

दोन्ही काँग्रेस हे कधी एकमेकांचे तोंड बघत नव्हते. यांची विचारांची सांगड बसत नव्हती. एक मतं नव्हती. दोन काँग्रेस एका विचाराची होऊ शकत नाही, तर शिवसेना काँग्रेस एकविचाराची कदापी होऊ शकणार नाही. ते दोन एक होऊ शकत नाहीत , मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. दोन काँग्रेस एकत्र येऊ शकत नाहीत, तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणे कदापी शक्य नाही, असं अनंत गीते म्हणाले.

कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच. आघाडीचे नेते आघाडी सांभाळतील आपल्याला ग्रामपचांयत, पचांयत समिती, जिल्हा परिषद सांभाळायची आहे, असं अनंत गीते म्हणाले.

उद्या आघाडी तुटलीच तर आपण सुनील तटकरेंकडे जायचे का, आपण आपल्याच घरी येणार. म्हणून आपल्याला आपला पक्ष बळकट करायचा आहे, आघाडी नाही, असंही अनंत गीतेंनी नमूद केलं.