गिलच्या सफाईदार अर्धशतकी खेळीने भारताने केली सावध सुरुवात

0
192

सिडनी, दि.०८ (पीसीबी) : – स्टिव स्मिथची जिगरबाज शतकी खेळीचे महत्व तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रवींद्र जडेजा आणि शुभमन गिल यांच्या कामगिरीसमोर काहिशी फिकी पडली.

स्मिथच्या लढाऊ शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३३८ धावांची मजल मारता आली. दुसऱ्या दिवशी स्मिथ लढत असताना भारताकडून रवींद्र जडेजाने चार गडी बाद करताना ऑस्ट्रेलियाचा डाव मर्यादित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर गिलच्या सफाईदार अर्धशतकी खेळीने भारताने दुसऱ्या दिवस अखेरीस २ बाद ९६ अशी सावध सुरवात करताना एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न केला.

डावखुरा फिरकी गोलंदाज जडेजा (४-६४) आणि जसप्रित बुमरा (२-६६) यांच्या प्रयत्नांमुळे ऑस्ट्रेलियाला मोठा मजल मारता आली नाही. स्मिथ आणि लाबुशेन खेळत असताना ऑस्ट्रेलियाला चारशेची मजल खुणावत होती. पण, एकवेळ २ बाद २०६ अशा सुस्थितीत असणारा ऑस्ट्रेलियाचा डाव अखेर ३३८ धावांत आटोपला. स्मिथच्या खेळीला पूर्णविराम देताना जडेजाने केलेला थ्रो केवळ अप्रतिम होता. त्याच्या थेट फेकीने स्मिथ धावबाद झाला आणि त्याच्यासह ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आला.

भारताच्या डावाला रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आत्मविश्वासाने सुरवात केली. गिलची फलंदाजी ही एखाद्या अनुभवी फलंदाजासाठी सफाईदार होती. रोहितही चांगला खेळत होता. मात्र, हेझलवूडने त्याला स्वतःच्याच गोलंदाजीवर टिपले. त्यानंतर पॅट कमिन्सने गिलची विकेट मिळविली. त्यानंतर दिवस अखेरीस अजिंक्य रहाणे (५) आणि चेतेश्वर पुजारा (९) यांनी भारताचे आणखी नुकसान होऊ दिले नाही.

त्यापूर्वी, सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रातील एखाद दुसऱ्या पावसाच्या सरी नंतर पार पडलेल्या खेळात स्मिथच्या शतकी खेळाची चर्चा झाली. एकदिवसीय सामन्यातील यशानंतर कसोटी क्रिकेटमध्ये यश त्याच्यावर रुसले होते. मात्र, या कसोटीत त्याने आपली लय पुन्हा मिळवली आणि कारकिर्दीमधील २७वे कसोटी शतक साजरे केले. त्याचा कालचा नाबाद सहकारी मार्नस लाबुशेन (९१) शतकापासून वंचित राहिला. या जोडीच्या प्रतिकारानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर फिके पडले.

चेंडू जुना असेपर्यंत अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी जोडीने मारा केला. चेंडू थांबून येत असल्याने फलंदाजाला खेळणे सोपे जात होते. मात्र, फिरकी गोलंदाजांना सतत बॅकफूटवर खेळण्याची चूक लाबुशेनला महागात पडली. जडेजाच्या एका उंची मिळालेल्या चेंडूंवर बॅकफूटवर खेळताना बॅटची कड घेतलेला चेंडू स्लिपमध्ये रहाणेच्चा सुरक्षित हाती विसावला. लाबुशेन ९१ धावांवर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलिया डावात घडले ते फक्त स्मिथचे शतक. खेळपट्टीवर टिकल्यावर धावा करायच्या असतात हे त्यांचे फलंदाज विसरून गेले. कॅमेरून ग्रीन २२ चेंडू खेळल्यानंतरही खाते उघडू शकला नाही. कर्णधार टिम पेन, पॅट कमिन्स यांनीही धावा करण्याचा प्रयत्नच केला नाही. मॅथ्यू वेडला अतिघाई महागात पडली. अशा वेळी मिशेल स्टार्कने स्मिथला साथ दिल्याने ऑस्ट्रेलियाला समाधानकारक मजल मारता आली. स्मिथनेही शतकासाठी खूप चेंडू घेतले. त्यामुळे ९९ वरून शतक पूर्ण करण्याची प्रतिक्षा चांगलीच ताणली गेली होती. शथकानंतर स्मिथने आक्रमक खेळायला सुरवात केली. एकेरी धाव घेतल्या दुसरी धाव चोरण्याच्या नादात तो जडेजाच्या थेट फेकीने धावबाद झाला.

पहिला दिवस अपयशी गेल्यानंतरही आज भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. नव्या चेंडूवर भारतीय गोलंदाजांनी यश मिळविले. पण, लक्षात राहिला तो जडेजाचा स्पेल. त्याने १८ षटकांत ६२ धावांत ४ गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव १०५.४ षटकांत सर्वबाद ३३८ (विल पुकोवस्की ६२, मार्नस लाबुशेन ९१, स्टिव स्मिथ १३१, रवींद्र जडेजा ४-६२, जसप्रित बुमरा २-६६)

भारत पहिला डाव ४५ षटकांत २ बाद ९६ (शुभमन गिल ५० (१०१), रोहित शर्मा २६, अजिंक्य रहाणे खेळत आहे ५, चेतेश्वर पुजारा खेळत आहे ९, पॅट कमिन्स १-१०, जोश हेझलवूड १-२३)