मुंबई, दि. १३ (पीसीबी) – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची त्यांच्या शिवनेरी बंगाल्यावर जाऊन आज (सोमवार) भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून विखे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत .
या भेटीत राधाकृष्ण विखे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राज्य मंत्रिमंडळात कोणते खाते द्यायचे याबाबत चर्चा झाली असावी, असे तर्कवितर्क लढविले जात आहेत . गिरीश महाजन यांची विखे यांचे पुत्र डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाबाबत महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
दरम्यान, गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या भेटीबाबत राधाकृष्ण विखे यांनी खुलासा केला आहे. मी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील तिढा सुटावा, यासाठी महाजन यांची भेट घेतली.
तसेच नगरमधील पाणी प्रश्नावर आणि कालव्याच्या काम संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. माझ्या भाजप प्रवेशाची उत्सुकता माझ्यापेक्षा प्रसार माध्यमानाच अधिक आहे, असे विखे म्हणाले.