गिरीश महाजनांच्या मध्यस्थीनंतर अण्णांचे उपोषण मागे

0
528

अहमदनगर, दि. २ (पीसीबी) – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जनलोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आजपासून (मंगळवार) सुरू करण्यात येणारे उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विविध मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यामुळे उपोषण स्थगित करत आहोत, अशी घोषणा अण्णा हजारे यांनी केली.

मागण्या मान्य न झाल्यास गांधी जयंतीपासून पुन्हा उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा अण्णांनी दिला होता. अण्णांनी उपोषण मागे घेण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सकाळीच राळेगणसिद्धीत दाखल झाले. त्यांनी अण्णांशी चर्चा करुन, सर्व मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. तसेच मागण्यांबाबत केंद्राकडे पाठपुरावा सुरु असून सकारात्मक पावले उचलली जातील, असे  आश्वासन गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले.

त्यामुळे सरकारच्या आश्वासनानंतर अण्णा हजारे यांनी तूर्तास आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, यावेळी अण्णांनी शेती प्रश्न, दूध दर, लोकपाल, लोकायुक्त नियुक्ती अशा विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले. कृषिमूल्य आयोगाला स्वायत्तता द्या, दूधाला दर द्या, केंद्रातील लोकपालप्रमाणे राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती करा, अशा मागण्या अण्णांनी केल्या आहेत.