गिरणी कामगाराचा मुलगा बाळासाहेबांमुळेच मुख्यमंत्री झाला – नारायण राणे

0
453

मुंबई, दि. १७ (पीसीबी) – आज माझे जे काही कौतुक होते आहे त्याचे सर्व श्रेय बाळासाहेबांनाच जाते. कणकवलीतील वरवडे गावचा एका गिरणी कामगाराचा मुलगा, ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती तो या राज्याचा मुख्यमंत्री बनला. मी शिवसेनेत असताना कधीच पदे मागितली नाहीत. शाखाप्रमुख, मंत्री, मुख्यमंत्री ही सगळी पदे बाळासाहेबांनीच दिली, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचा आदर व्यक्त केला.

नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात राणे म्हणाले की, मी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर पुस्तके लिहिण्याचाच संकल्प केला होता. पण काय करू परिस्थिती मला निवृत्त होऊ देत नाही. कणकवलीतील वरवडे गावचा एका गिरणी कामगाराचा मुलगा, ज्याला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती तो या राज्याचा मुख्यमंत्री बनला. यातून तरुणांना काही तरी शिकायला मिळावे, प्रेरणा मिळावी यासाठी हे आत्मकथनपर पुस्तक लिहिले.

शिवसेनेसोबत भाष्य करताना भावूक होत नारायण राणे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनीच मला घडविले, मार्गदर्शन केले. अंगात भिनवले. भाषण कसे करायचे ते शिकवले. त्या काळी वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासारखे नेते सत्तेत होते. त्या काळात शिवसेना वाढणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. मात्र, तेव्हा जीवाला जीव देणारे शिवसैनिक होते. बाळासाहेबांनी आम्हाला मनाचा मोठेपणा ठेवा अशी शिकवण दिली. मनाचा मोठेपणा दाखवला की माणूस मोठा होतो ही शिकवण त्यांनी आम्हाला दिली. ती मी जोपासली म्हणून लोकांसाठी काही करू शकलो. आई-वडिलांनी मला जेवढे प्रेम दिले नाही तेवढे प्रेम बाळासाहेबांनी दिले.