Chinchwad

गावठी कट्ट्यासह पिंपळे गुरव येथून तरुणाला अटक

By PCB Author

November 19, 2018

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – गावठी कट्टा आणि एक जीवंत काडतुसासह तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई रविवारी (दि.१८) सायंकाळी साडेआठच्या सुमारास पिंपळे गुरव येथील मोरया पार्क गल्ली नं. ४ येथील सार्वजनिक रस्त्यावर सांगवी पोलिसांनी केली.

इसाक रज्जाक शेख (वय २५, रा. मोरया पार्क गल्ली नं. ४, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक नितीन दांगडे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी शेख यांच्यावर अनअधिकृतपणे हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सांगवी पोलिसांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली होती कि, पिंपळे गुरव येथील मोरया पार्क गल्ली नं. ४ येथील सार्वजनिक रस्त्यावर एक तरुण उभा असून त्यांच्याजवळ पिस्तूल आहे. पोलिसांनी त्यानुसार त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी इसाक शेख याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळ २६ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुस आढळून आले. पोलिसांनी ते जप्त करुन इसाकला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ तपास करत आहेत.

दरम्यान, आरोपी इसाक शेख हा रिक्षा ड्रायव्हर असल्याचे देखील तपासात समोर आले आहे.