गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण…

0
304

मुंबई, दि. ११ (पीसीबी) : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आलं आहे. मंगेशकर कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता दीदींना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दीदींचं वय लक्षात घेता खबरदारी म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना न्युमोनिया झाला आहे. याला कोविड न्युमोनिया असं म्हटलं जातं. दरम्यान, लता मंगेशकर यांना रविवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या महापौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, लता मंगेशकर यांना कोविड न्युमोनिया झाला आहे. रविवारी पहाटे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. तसेच, मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम लता दीदींवर उपचार करत आहेत.

दरम्यान, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. आज त्या तब्बल 92 वर्षांच्या आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायिली आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना ‘लता दीदी’ म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. लता दीदींना आपल्या घरातूनच गायनाचा वारसा मिळाला आहे. त्यांनी अवघ्या 5 वर्षाच्या वयात आपल्या वडीलांकडून संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली होती.