गांधी जयंतीनिमित्त राज्यातील १०० कैद्यांची सुटका होणार!  

0
412

नाशिक, दि. २ (पीसीबी) – महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १०० कैद्यांना सुटका करण्यात येणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या तळोजा कारागृहातून सर्वाधिक कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

येत्या ५ ऑक्टोबरला या सर्व कैद्यांची सुटका केली जाणार आहे. राज्यातील एकूण नऊ मध्यवर्ती कारागृह तसेच वर्धा आणि धुळे कारागृह अशा एकूण ११ कारागृहांतून १०० कैदांची सुटका केली जाणार आहे. तळोजा कारागृहातून ३७ कैदी, येरवडा कारागृहामधून २४ कैदी, नाशिक कारागृहामधून १० आणि इतर कारागृहातील प्रत्येकी एक-दोन कैद्यांना सुटकेमुळे दिलासा मिळणार आहे.

ज्या कैद्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत, त्यांचे वय ५५ वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्याची ५० टक्के शिक्षा पूर्ण झालेली असावी, अशा कैद्यांची सुटका होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या कैदाचे वय ५५ पेक्षा कमी असेल त्याने ६६ टक्के शिक्षा पूर्ण झालेली असेल, शिवाय महिला आणि ज्यांना अपंगत्व किंवा फिजिकल चॅलेंज आहेत, अशांची शिक्षा देखील ५० टक्के पूर्ण झालेली असेल तर या कैद्यांची सुटका होणार आहे.