Pune

गांधी, आंबेडकर यांच्यावरून वाद घालणे देशाच्या ऐक्याला घातक – शरद पवार  

By PCB Author

December 10, 2018

पुणे, दि. १० (पीसीबी) – हिंदू आणि मुस्लिम समाजात अंतर निर्माण करण्याचे काम सध्या भाजपकडून  सुरू आहे. ही विचारधारा देशाच्या ऐक्याला घातक  असून गांधी आणि आंबेडकर यांच्यावरून वाद घालण्याचे प्रकार केले जात आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी केला आहे.  या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे, असेही ते यावेळी  म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एकदिवसीय ‘निर्धार विजयाचा, लक्ष २०१९’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पवार म्हणाले की, देशात साडेचार वर्षे भाजपाचे सरकार आहे. मग इतके दिवस काय केले, असा सवाल करून  निवडणुका आल्या की यांना राम मंदिराची आठवण येते. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे. त्यांनीच आता अन्याय सुरु केला आहे, असे पवार म्हणाले.

दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम आम्ही केले. मात्र हे सरकार त्याचा विचार करत नाही. दुष्काळामुळे शेतकरी होरपळत असताना, यावर सरकार काही पावले उचलताना दिसत नाही. यातून या सरकारची मानसिकता लक्षात येते, अशी टीका पवारांनी केली.