Maharashtra

गांधीजींना अभिवादन करत राज ठाकरेंची व्यंगचित्राव्दारे मोदींवर टीका

By PCB Author

October 02, 2018

मुंबई, दि. २ (पीसीबी) – महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ‘महात्मा गांधी हे चरख्यावर सूत कातायचे व कपडे तयार करायचे. पण नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जनतेचे कपडे उतरवून त्यातून सूत काढत आहेत’, अशी टीका त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५० वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे. महात्मा गांधींना अभिवादन करतानाच राज ठाकरेंनी ‘अच्छे दिन’वरुन मोदी- शाह यांच्यावर निशाणा साधला. महात्मा गांधी चरख्यातून सूत कातायचे व कपडे तयार करायचे. पण मोदी सरकारच्या काळात उलट्या दिशेने प्रवास होत असल्याचे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. यात मोदी आणि अमित शाह हे चरख्यावर सूत कातताना दिसत आहे. सूतापासून कपडा तयार करण्याऐवजी कपड्यापासून सूत काढले जात आहे. यासाठी जनतेचे कपडे उतरवले जात आहे, असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

‘कापडापासून सूत’ असा या व्यंगचित्राचा मथळा असून मोदी सरकारच्या काळात देशात आर्थिक आणि वैचारिक गोंधळ दिसून येतो, अशी टीका राज ठाकरे यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून केली आहे.