गव्हाऐवजी मैद्याचा वापर केल्याप्रकरणी पार्ले बिस्किट कंपनीवर कारवाई   

0
1897

ठाणे, दि. २८ (पीसीबी) – गव्हाऐवजी मैद्याचा वापर करून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी पार्ले बिस्किट कंपनीच्या ठाणे येथील उत्पादकावर अन्न व औषध प्रशासनाने  कारवाई केली आहे. याप्रकरणी अमेरिकेत वास्तव्यास  असलेल्या विष्णू कर्नाटकी यांनी  तक्रार दाखल केली होती.  

पार्ले कंपनीचे उत्पादक तुटलेल्या आणि नाकारण्यात आलेल्या बिस्किटांचा पुनर्वापर करून नवीन बिस्किटे तयार करतात. या बिस्किटांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्री केली जात असल्याची तक्रार अमेरिकेतील कूपर्टीनो शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या विष्णू कर्नाटकी यांनी  ६ ऑक्टोबर २०१७ मध्ये लोकआयुक्त कार्यालयामध्ये केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई विभागातील अधिकाऱ्यांनी विलेपार्ले येथील कंपनीला भेट दिली.

ठाण्यातील अंबरनाथ येथे बंटी फूडस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये पार्ले कंपनीच्या बिस्किटांचे उत्पादन केले जाते. पार्ले कंपनीच्या बिस्किटांच्या वेष्टनावर बिस्किटे बनविण्याच्या सामुग्रीमध्ये गहू वापरल्याचे नमूद केले. परंतु ठाण्यातील उत्पादक कंपनीला भेट दिली असता मैदा वापरत असल्याचे आढळून आले. तेव्हा वेष्टनावर चुकीची माहिती छापून नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयामध्ये कंपनीवर गुन्हा दाखल केला.