गर्दीत एकाने मला नको त्या ठिकाणी चिमटा काढला-कंगना राणावत

0
1341

मुंबई, दि. २३ (पीसीबी) – #MeToo या मोहिमेत आता अभिनेत्री कंगना राणावतने तिला आलेला एक किळसवाणा अनुभव सांगितला आहे. लोकांच्या गर्दीत मला एकाने नको त्या ठिकाणी चिमटा काढला आणि निघून गेला. हा अनुभव आठवला तरीही किळस येते, घृणा वाटते असे कंगनाने म्हटले आहे. एवढेच नाही तर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांनी स्वतःच घेतली पाहिजे असेही कंगनाने म्हटले आहे. कंगनाचा मणिकर्णिका हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने तिचा अनुभव सांगितला आहे.

याआधी कंगनाने क्वीन या सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. विकासने आपल्याशी असभ्य वर्तन केले असे कंगनाने त्यावेळी म्हटले होते. मीटू मोहिमेमुळे अनेक लोक आता मुलींशी, महिलांशी, अभिनेत्रींशी असभ्य वर्तन करताना विचार करतील. कारण आता या गोष्टी महिला पुढे येऊन सांगत आहेत. त्यासंदर्भात तक्रार दाखल केली जाते आहे ही या मोहिमेची सकारात्मक बाजू आहे असेही कंगनाने म्हटले आहे.

कंगनाने मध्यंतरीच्या काळात राणी मुखर्जीने जे मत मीटू मोहिमेबद्दल मांडले होते त्याचेही समर्थन केले आहे. तरुणींनी, महिलांनी स्वत:च्या रक्षणासाठी मार्शल आर्ट्स शिकले पाहिजे. यांसारख्या गोष्टींचा शाळेच्या अभ्यासक्रमातही समावेश करावा. स्वसंरक्षणासाठी महिलांनी समर्थ असले पाहिजे,’ असे मत राणीने मांडले होते. कंगनाने राणी मुखर्जीचे हे म्हणणे योग्य असल्याचे म्हटले आहे.