गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपचा “भोरगिरी ते भीमाशंकर जंगल ट्रेक..!

0
631

चिंचवड, दि. ९ (पीसीबी) – येथील गरवारे टेक्निकल फायबर या कंपनीतील निसर्गप्रेमी ग्रुपने आपली निसर्गाची आवड जपत, सह्याद्रीच्या पश्चिम घाट परिसरातील पर्वतरांगांमध्ये पसरलेल्या अभयारण्यात भोरगिरी ते भीमाशंकर या जंगल वाटेवर भटकंती केली.

पुणे – नाशिक रोडवरून राजगुरुनगर येथून पश्चिमेकडील बाजूस वळण घेऊन, भोरगिरीस जाता येते. या रस्त्याने जाताना चासकमान धरणाच्या आजूबाजूस दिसणारा हिरवागार आसमंत वाऱ्याच्या तालावर लय धरलेली हिरवीगार भातखाचरं, कडय़ावरून स्वत:ला झोकून देणारे धबधबे आणि धुक्यातून हळूच डोकं वर काढून आपल्याला दर्शन देणारा सह्याद्री!

चासकमान-वाडा-टोकावडे-शिरगाव या रस्त्याने वेडीवाकडी वळणं घेत सुमारे ५० किलोमीटरचा टप्पा पार करून आपण भोरगिरी मध्ये दाखल होतो. या प्रवासात वर उल्लेख केलेली सगळी दृश्य ही भान हरपून टाकणारी असतात.

भोरगिरीतून एखाद्या गावकऱ्यास घेऊन आपला प्रवास भोरगिरी गडापासून सुरु होतो. निसर्गाचा अविस्मरणीय सहवास. दाव्याबाजूने शेवटपर्यंत असणारी एका नितांत सुंदर खळाळत्या ओढय़ाची साथ व त्याच्या आवाजाचे मिळालेले सुरेख पार्श्वसंगीत,  डोळय़ाचे पारणं फेडणारी आजूबाजूची हिरवाई  आणि मध्येच समोरून भुर्रकन उडून जाणारा एखाद्या खंडय़ा पक्षी विविध रंगाची फुलपाखरे, अशा सुंदर वातावरणात ही भटकंती सुरु होते.

हिरव्यागर्द झाडीतून  शांत वातावरणात दगडातून वाहणाऱ्या झुळझुळ पाण्याचा विविध पक्षांचा, मंजुळ, आवाज टिपत भीमाशंकरच्या दिशेनी आपला प्रवास डोंगरातील चढ उतारावरून, सुरु असतो.

जवळपास चार तासाच्या व सात किलोमीटरच्या या जंगल ट्रेकमध्ये “गुप्त भीमाशंकर” हे एक महत्वाचे व पवित्र ठिकाण आहे, मंदिराजवळ उगम पावलेली भीमा नदी गुप्त होऊन पुन्हा या जागी एका पिंडीच्या खालून उगम पावते. या पवित्र जागेस “गुप्त भीमाशंकर” असे म्हणतात.

या ठिकाणी असलेल्या स्वच्छ आणि नितांत सुंदर धबधब्याखाली मनसोक्त अंघोळ केल्याने सर्व ट्रेकचा शीण निघून जातो. पुढे चालून अर्ध्या तासातच आपण भीमाशंकर मंदिराजवळ पोहचतो. मंदिरात जाऊन पवित्र अशा बारा ज्योतिर्लिंगातील एक “भीमाशंकराचे” दर्शन केल्यानंतर आपल्या ट्रेकची सांगता होते.

या ट्रेककमध्ये शाम कुंभार, माधव ढमाले, काळूराम कुंभार, विलास पाटील, सतीश तारू, शेखर गाडे, भीमराव पाटील, काका हजारे, महेश तुरेराव व अमित पाटील आदींनी सहभाग घेतला होता.