गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे आणि डॉल्बीवरील बंदी कायम

0
583

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – गणेश विसर्जन मिरवणूकीत डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन हायकोर्टाने डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास नकार दिला.

गणेश विसर्जनाच्या गोंगाटाला आळा घालण्यासाठी पोलिसांनी डीजे आणि डॉल्बी वाजवण्यास परवानगी नाकारली होती. याविरोधात प्रोफेशनल ऑडिओ अॅण्ड आणि लाइटनिंग असोसिएशनने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (शुक्रवार) सुनावणी झाली. या सुनावणीत गणेश विसर्जनाच्या मिरवणूकीत डीजे  आणि  डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला. चार आठवड्यांनी या प्रकरणावर हायकोर्टात अंतिम सुनावणी होणार आहे. हायकोर्टातून दिलासा न मिळाल्याने याचिकाकर्ते आता सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत डीजे व त्यासारखी कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजवणे सुरू करताच त्यांची किमान आवाजमर्यादा ही १०० डेसिबलपर्यंत असते. त्यामुळेच कमालीचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती.