गणेश विसर्जनासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची तगडी तयारी; अनुचित प्रकार टाळण्याची अडीच हजारहून अधिकचा बंदोबस्त

0
772

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातील एकूण ९७३ सार्वजनिक गणपती मंडळ यंदा आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहेत. यामुळे मिरवणुकी दरम्यान काही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तगडी तयारी केली आहे.

शहर परिसरातील नदीघाट आणि पिंपरी महापालिकेने तयार केलेल्या हौदात घरघुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे विसर्जन करण्यात येते. यावेळी काही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिसांच्या सुट्टया रद्द करुन विविध भागात अडीच हजारहून अधिकचा पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे.

यामध्ये बाहेरून आलेले ०५ वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ३० पोलीस उपनिरीक्षक, १५ सहायक पोलीस निरीक्षक, १ हजार होमगार्ड, एसआरपीएफची एक कंपनी तर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील जवळपास २ हजार ५०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गणपती विसर्जनाच्या वेळी तैनात असणार आहेत. याचबरोबर पोलीस मित्र आणि नागरिक पोलीस मित्र असे मिळून २५० जण नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. गणपती उत्सव हा शांततेत, चांगल्या प्रकारे साजरा होईल. मंडळांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि शिस्तबद्ध मिरवणुका असाव्यात, असे आवाहन अप्पर पोलीस आयुक्त पोकळे यांनी केले आहे.