Maharashtra

गणेशोत्सवात सजावटीवर खर्च न करता ते पैसे पूरग्रस्तांना द्या

By PCB Author

August 10, 2019

मुंबई, दि. १० (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाना समन्वय समितीने मदतीचे आवाहन केले आहे. गणेशोत्सवात सजावटीवर खर्च न करता ते पैसे मंडळांनी पूरग्रस्तांना द्यावेत, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केले आहे.

गेले सहा दिवस सांगली आणि कोल्हापुराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. अनेक लोक बेघर झाले आहेत, पुरात अडकले आहेत. राज्य सरकारचा आपत्कालीन विभाग, एनडीआरएफ यांचे बचावकार्य सुरू आहे. मात्र पुरात जिवीत आणि वित्तहानी खूप झाली आहे. अशा वेळी येत्या गणेशोत्सवात मंडप सजावटीवर हजारो रुपये खर्च न करता सार्वजनिक मंडळांनी पूरग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.

गणेशोत्सव येत्या २ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मुंबईत या उत्सवादरम्यान कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. लहानमोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे ठरवले तरी खूप मोठा निधी उभा राहू शकतो, या दृष्टीने समितीने हे आवाहन केले आहे.