Notifications

गणपतीची वर्गणी न दिल्याने टोळक्यांकडून मायलेकाला लोखंडी पाईपने जबर मारहाण

By PCB Author

September 06, 2019

वाकड, दि. ६ (पीसीबी) – गणपतीची वर्गणी न दिल्याच्या रागातून दहा जणांच्या टोळक्याने मायलेकाला लाकडी दांडके आणि लोखंडी पाईपने जबर मारहाण केली. ही घटना वाकड परिसरातील सदगुरू कॉलनीत घडली.

याप्रकरणी रमेश देवराम चौधरी (वय ३७, रा. सदगुरू कॉलनीत, वाकड) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर घडसिंगसह दहा जनांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर हा वाकड परिसरातील सदगुरू कॉलनीत राहतो. तर फिर्यादी यांचे त्याच परिसरात माताजी कलेक्शन नावाचे कपड्याचे दुकान आहे. कॉलनीत ओम साई गणपती मंडळ असून त्याची ५ हजार वर्गणी का देत नाहीत म्हणून मध्यरात्री आरोपीने फिर्यादी यांच्या बंद दुकानाची जाळी जोरजोरात वाजवत होता. तेव्हा, फिर्यादी आणि जखमी भाऊ मुकेश चौधरी, आई जमनीबाई चौधरी हे त्याला विरोध करत होते.

सागरने दहा जणांचे टोळके बोलावले त्यांच्या हातात लाकडी दांडके होते. तर सागरच्या हातात लोखंडी पाईप होता, तुम्ही आम्हाला वर्गणी का देत नाही थांब तुला जीवे ठार मारतो असे म्हणून लोखंडी पाईप ने फिर्यादी यांचा भाऊ मुकेशच्या डोक्यात मारला यात ते गंभीर जखमी झाले आहेत. तर इतर टोळक्याने लाकडी दांडक्याने आईला आणि फिर्यादी यांना मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास वाकड पोलीस करत आहेत.