Maharashtra

गड-किल्ल्यांचे संवर्धन व्हावे म्हणून हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे देशभर आंदोलन!

By PCB Author

June 29, 2021

– पारोळा (जळगाव) येथील भुईकोट किल्ल्याची अत्यंत दयनीय अवस्था – किल्ल्याचे पावित्र्य रक्षण अन् संवर्धन करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

जळगाव, दि.२९ (पीसीबी) : महाराष्ट्रातील गड-किल्ले हे आपल्या पूर्वजांच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा लाभलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा येथील पेशवेकालीन भुईकोट किल्ला हा असाच एक ऐतिहासिक आहे; मात्र किल्ल्याची झालेली पडझड, भग्नावस्था, किल्ल्याचा शौचालय/मुतारी म्हणून वापर, आवारातील कचरा आणि घाणीचे साम्राज्य अशी अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. कोणीही देखरेख करणारा नसल्यामुळे या परिसरात मद्य पिणे, जुगार खेळणे ही सर्रास चालू असून आतमध्ये डुकरांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. एकूणच पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा भुईकोट किल्ला अत्यंत दुरावस्थेत आहे. या किल्ल्याची त्वरीत डागडुजी करून किल्ल्याचे पावित्र्य रक्षण आणि संवर्धन करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. किल्ल्याची डागडुजी समयमर्यादा घालून पूर्ण करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने ‘ऑनलाईन’ आंदोलन करण्यात आले. तसेच या संदर्भातील एक निवेदन राज्य पुरातत्त्व खाते, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याचे समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले आहे.

देशभर आंदोलन : याविषयी स्थानिक प्रशासनाला निवेदन देणे, हातात हस्तफलक धरलेली छायाचित्रे, स्वत:ची चित्रीकरण केलेली प्रतिक्रिया (व्हिडिओ बाईट) तथा जनजागृतीपर संदेश सामाजिक प्रसारमाध्यमांवर पाठवणे अशा प्रकारे आंदोलन करण्यात आले. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, दिल्ली, आसाम, हरियाणा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिसा, पश्‍चिम बंगाल, मेघालय या राज्यांतील दुर्ग आणि राष्ट्र प्रेमी नागरिक सहभागी झाले होते. या आंदोलनात हिंदु राष्ट्र सेना, झुंज प्रतिष्ठान पुणे, राष्ट्रीय संत सुरक्षा परिषद भुसावळ, जळगाव जिल्हा दुर्ग संवर्धन, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना सहभागी झाल्या होत्या.

नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गड-किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि त्यांचे टप्प्याप्प्याने संवर्धन करण्यासाठी पाऊल उचलेली आहेत. दुर्गप्रेमींनी गड-किल्ल्यांविषयीच्या सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. त्यादृष्टीने आम्ही प्रशासनाकडे मागण्या केल्या आहेत की, गडाची डागडुजी-दुरुस्ती लवकरात लवकर चालू करावी. महाराष्ट्र शासनाने सध्या राज्यातील काही गडकिल्ले संवर्धनासाठी घेतले आहेत. त्या सूचीत या भुईकोटाचा समावेश व्हावा. पुरातत्व खात्याने या भुईकोट किल्ल्याला नियमित भेट देऊन परिस्थितीचा पारदर्शीपणे अहवाल शासनाला सादर करावा. गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर (गडाचा मुत्रालय म्हणून उपयोग, डुकरांचा वावर), तसेच अन्य अशा सर्वच अयोग्य गोष्टींना गडावर प्रतिबंध करावा. या गडाविषयी संपूर्ण महत्त्व सांगणारे विविध फलक येथे सर्वांना दिसतील, अशा दर्शनी भागात लावण्यात यावेत. तसेच या किल्ल्याच्या दुरवस्थेला कारणीभूत असणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, असेही समितीने म्हटले आहे.