Maharashtra

गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी डीवायएसपीचे निलंबन;  विधानपरिषदेत गृहराज्यमंत्र्यांची घोषणा

By PCB Author

June 21, 2019

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळ एक मे रोजी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचे निलंबन करण्यात आले आहे. आज गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली.

गडचिरोलीत महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात १५ पोलीस जवान शहीद झाले होते.  याबाबत लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुरक्षेचे नियम पाळले न गेल्यामुळे झालेल्या या हल्ल्याला पोलीस उपअधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली.

या नक्षलवादी हल्ला प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल सरकारला प्राप्त झाला असून येत्या दोन दिवसात त्यावर निर्णय होईल आणि दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं केसरकर यांनी सांगितले.

मात्र या हल्ल्यानंतर या पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्या विरोधात भावना तीव्र होत्या. शहीद पोलिसांच्या पत्नीने देखील शैलेश काळे यांच्या विरोधात तक्रार केली होती. म्हणून पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांचे निलंबन करण्याची मागणी विरोधी पक्ष नेत्यांनी केली. यानंतर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काळे यांचे निलंबन करण्याबाबत घोषणा केली.