Maharashtra

गडचिरोलीत खबरी असल्याच्या संशयातून नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

By PCB Author

January 22, 2019

गडचिरोली, दि. २२ (पीसीबी) –  भामरागड तालुक्यातील ताळगाव पोलिस स्थानक हद्दीतील कसनुर येथील मालू दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी आणि लालसु मासा कुळयेटी या तिघांची पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी हत्या केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, २२ एप्रिल २०१८ मध्ये पोलिसांकडून कसनुर आणि तुमीरगुंडा गाव परिसरातील बोरिया जंगलात झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी साईनाथ व माओवादी संघटनेचा जिल्हा सचिव श्रीनिवास यांच्यासह ४० नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांना गुप्त माहिती पुरविल्याचे संशयावरून सदर तिन्ही इसमांची हत्या करण्यात आल्याची घटनास्थळी लावण्यात आलेल्या फलकावर उल्लेख करण्यात आला आहे.  सदर कार्यवाही दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमिटी भाकपा (माओवादी) असाही उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. घटनेमुळे जिल्ह्यात दहशत पसरली असून पोलिसांकडून नक्षलविरोधी शोध मोहिम तीव्र करण्यात आली आहे.