“गंगेत तरंगणारे प्रत्येक प्रेत बोलतय…मोदीजी सावधान !!!”– थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
701

कधीकाळी सोन्याचा धूर निघायचा त्या आपल्या भारत देशात आज अंत्यसंस्काराला पैसे नाहीत म्हणून मृतदेह थेट नदित फेकून दिले जातात किंवा किनाऱ्यावर वाळूत पुरले जातात. कितीतरी दाहक पण वास्तव चित्र आहे. काळीज पिळवटून टाकणारी असली एक एक बातमी रोज येते. बक्सर जिल्ह्यातील चौसा स्मशानाजवळ गंगा नदित तब्बल ७१ फुगलेले, सडलेले मृतदेह तरंगताना आढळले. देश विदेशातील माध्यमांनी हे विदारक चित्र जगभर दाखवले. ४-५ दिवसांपूर्वी गंगेच्या पाण्यात टाकून दिलेले असे आणखी काही मृतदेह दुसऱ्या एका ठिकाणी मिळाले. कोरोना रुग्णांचेच हे मृतदेह असल्याने पाण्यातून आणखी संसर्ग होऊ शकतो, असा तज्ञांचा अंदाज आहे. हे कमी झाले म्हणून की काय बुधवारी आणखी तिसराच प्रकार उघडकीस आला. गंगेच्या विस्तृत किनाऱ्यावर गाजीपूर मध्ये किमान हजारावर मृतदेह वाळूत पूरल्याच्या बातम्या आल्या. भाजपा विरोधक राजकीय मंडळी सांगतात की, कोरोना मृतांची आकडेवारी लपविण्यासाठी हे प्रकार झाले असावेत. असे आणखी काही प्रकार आहेत, पण देशाची बदनामी नको म्हणून बहुसंख्य माध्यमे तोंड दाबून बुक्यांचा मार खात आहेत. मोदींच्या कह्यात गेलेल्या मीडिया प्रचंड दबावाखाली आहे पण कोंबडे झाकल्याने सुर्य उगवायचा राहत नाही.

मुळात हे असे का घडले तर म्हणे, मृतदेहांवर अंत्यसंस्कासाठी पैसे नाहीत, स्मशानात अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत, आठ-दहा तास वाट पाहावी लागते, त्यातच लाकडेही प्रचंड महागलीत तसेच सरकारलासुध्दा कोरोना मृतांचा आकडा लपवायचा आहे वगैरे वगैरे. यातले राजकीय आरोप प्रत्योरोप बाजुला ठेवा, पण गेले महिनाभर अशी जी काही दृष्य पाहतो त्यातून जनमत विचलीत झाले आहे. मोदी, शाह, योगी यांच्या बद्दल लोक संतापले आहेत. अशाच आणखी काही बातम्यासुध्दा विचार करायला लावतात. दिल्ली च्या स्मशानात अंत्यसंस्काराला जागा नसल्याने वेटींगमध्ये असलेल्या मृतदेहांच्या तिरड्यांची मोठीच्या मोठी रांग, बडोद्यात अंत्यसंस्कारासाठी दहा-दहा तास लागत असल्याने एका रुग्णालयात तीन दिवसांपासून सडत पडलेले मृतदेहांचा ढीग, इंदोर आणि भोपाळच्या स्मशानात एकाचवेळी ४५ ते ५० प्रेतांच्या जळणाऱ्या चितांचा उंचावरून ड्रोनमधून घेतलेला फोटो विदेशातील वर्तमानपत्रांनी छापला आणि भारत देशाची अब्रू जगाच्या वेशीवर टांगली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी शहरात मृतदेह नेण्यासाठी गाडी नसल्याने तीन चाकी रिक्षामधून मृतदेह नेणाऱ्या त्या अभागी आईचा फोटो ह्रदयद्रावक होता. कोरोना उपचाराअभावी मृत झालेल्या मुलीवर अंत्यसंस्कारासाठी स्वतःच्या खांद्यावर ३५ किलोमीटर चालत मृतदेह नेणारा एक गरिब बाप परवा देशाने पाहिला. उत्तर प्रदेश, बिहार मधील या बातम्या आहेत. मध्य प्रदेशातसुध्दा कमीअधिक तेच चित्र आहे. गुजराथमध्ये दोन लाखावर मृत्यू असताना ते दडविल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. कर्नाटक, राजस्थान, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड या राज्यांतून सुध्दा कोरोनाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यूसुध्दा आहेत, पण मृतदेहांची हेळसांड कुठेही दिसली नाही. किमान मृत्यूनंतर सन्माने निरोप मिळावा ही माणसाची अपेक्षा असते. गेंगेच्या पात्रातील आणि किनाऱ्यावरचे विदारक दृष्य माणुसकिला काळीमा फासणार आणि देशाला मान खाली घालायला लावणारे होते. २५ लाखांच्या कुंभमेळ्याने उत्तर भारताला संकटात ढकलले, कडेलोट केला. प. बंगलसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी, लाखोंच्या सभांनी त्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव केला. याला सर्वस्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच जबाबदार आहेत. भाजपा च्या स्वार्थासाठी या दोघांनी अक्षम्य चुका केल्या आणि देशा संकटात टाकला, हे सांगायला आता राहुल गांधींची गरज नाही. खरे तर, कोरोनाचे सुपरस्पेडर हे दोघे नेते ठरलेत.धक्कादायक प्रकार म्हणजे आजही मोदी अथवा शाह आपली चूक मान्य करत नाहीत. आज त्याचा परिणाम भाजपा एकदम बॅकफूटवर गेला आहे, जनमत घसरले आहे.

कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्णतः अपयशी ठरलेत. सामान्य जनताच नाही तर देश-विदेशातील तमाम माध्यमे, संशोधक संस्थांनीसुध्दा या मतावर शिक्कामोर्तब केले. जगप्रसिध्द टाईम्स मॅगेझीन ने मोदींना जबाबदार धरून अक्षरशः जाब विचारला. सर्वेच्च न्यायालयाने कान धरले तसे उच्च न्यायालयांनीसुध्दा सुनावले. `मोदी काय करतात`, असा सवाल निती आयोगापासून सगळ्यांनीच उपस्थित केला. वैद्यकीय क्षेत्रात गॅझेटचा दर्जा असलेल्या लॅनसेट ने मोदी गहाळ बसल्यानेच कोरोना साथीचा फटका बसल्याचा ठपका ठेवला. मार्च २०१९ मध्ये पहिली लाट होती त्यावेळी युरोप, अमेरिकेसह सर्व संपन्न देश एकदम होरपळले होते आणि १३७ कोटी लोकसंख्येचा भारत आपण कसे सावरलो या भ्रमात होता. पहिल्या लाटेतच काही दिवसांत दुसरी-तिसरी लाट येणार हे अंदज तज्ञांनी व्यक्त केले होते.

सर्व बड्या राष्ट्रांनी त्या दृष्टीने खबरदारी घेतली, तयारी केली. भारत आपल्याच मस्तीत राहिला आणि फसला. जगातील ४० छोट्या देशांना कोरोना लस देऊन उपकार करणाऱ्या नरेंद्र मोदींनी आपल्या जनतेला वाऱ्यावर सोडले. मोदी आपल्याच धुंदीत राहिले. बेसावधपणा चांगलाच अंगलट आलाय. आज दोन लाख मृत्यू दिसत असले तरी तो आकडा दोन कोटी पर्यंत जाऊ शकतो, अस जागतिक आरोग्य संघटनेपासून वैद्यकीय संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनीच एक सूरात सांगितले. गेले दीड-दोन महिने ऑक्सिजन अभावी प्राण गेलेल्या देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या किमान हजारावर गेली असेल. गोवा, नवी दिल्ली, लखनऊ, अहमदाबाद, मुंबई, वसई, ठाणे अशा शेकडो शहरांतील छोटी मोठी हॉस्पिटल ऑक्सिजन नसल्याने रुग्ण दाखल करून घेत नसल्याचे दिसले. उपचारासाठी साधा बेड मिळत नाही, व्हेंटीलेटर नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन नाही अशा हजारो नव्हे लाखोंनी तक्रारी आहेत. लढाई होणार असे माहित असताना आपले सरदार गमजा मारत बसले आणि स्वतःची पाठ ठोपटत राहिले. भाजपा आणि बिगर भाजपा अशी विभागणी पावलापावलावर दिसली. जनतेलाही ते राजकारण खटकले. आज भारत संकटात आहे आणि देशातील तमाम देश मदत करतात. याचकाच्या भूमिकेत भारत सापडला कारण मोदींची बेफिकीर वृत्ती. लाटेमागून लाट येणार, त्यात आपल्याकडे काही तयारी नाही याचे मोदींना आजही काहीच वाटत नाही याचे वाईट वाटते. लसीकरणातूनच देश सावरू शकतो, पण आजही १० टक्केसुध्दा लसीकरण होऊ शकलेले नाही. आता कोरना होऊन गेलेल्या काही नागरिकांना बुरशीजन्य रोगाने पछाडले आहे आणि तो महाभयंकर ठरू शकतो. गुजराथ मध्ये ९ लोकांचे डोळे काढावे लागले, मुंबईत या रोगाचा प्रादुर्भाव होतो आहे. या रोगावर इलाज मोफत केले जातील म्हणून देशातील काही राज्यांनी घोषणा केली, पण त्यावरच औषधे उपलब्द होत नाहीत. जी आहेत त्यांच्या किंमती शेकडो पटीत वाढल्या आहेत. म्हणजे पुढचे संकट किती भयंकर असेल याची कल्पना येते. एकूणच काय सर्वच पातळ्यांवर अलबेल आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन एकदा झाला, दुसऱ्यांदा वाढवला आणि आता तिसऱ्यांदा १ जू नपर्यंत वाढवला. हातावर पोट असणारे जगणार कसे हा प्रश्न आहे. समाज वैफल्यग्रस्त झाल्याचे अनेक दाखले देता येतील. इतका असंतोष खदखदतो आहे की, उद्या जर का त्याचा विस्फोट झाला तर काय होईल याची कल्पना न केलेली बरी. आता हे नकारात्मक चित्र सकारात्मक करण्यासाठी नविन कार्यक्रम सुरू केला आहे. भाजपा आणि मोदी यांची खालावलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा नवीन सकारात्मक चळवळीचा उपक्रम आहे. पण त्याचा अर्थ मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष करणे असा नव्हे. मोदी हे कोरोनाकडे दुर्लक्ष करून शहामृगासारखे वाळूत तोंड खुपसून बसलेत, अशी टीका राहुल गांधी करतात. कोरोनाचे संकटावर मात करण्यासाठी सकारात्मक वातावरण जरुरी आहेच, पण गंगेवर तरंगणारी प्रेते तुम्ही लपवू शकत नाही. योग्य उपचारासाठी आणखी शेकडो हॉस्पिटलस्, डॉक्टर्स, नर्स पाहिजेत. लस निर्मितीसाठी अमेरिका, इंग्लंड पुणे शहरातील सिरम सह अन्य सात कंपन्यांतून कोट्यवधी रुपयेंची गुंतवणूक करतात, लोकसंख्येच्या तुलनेत लस खरेदीची ऑर्डर बूक करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना हे सहज शक्य होते, पण तिकडे दुर्लक्ष केले हे दुखणे आहे. नविन संसद भवन, पंतप्रधान निवास यापेक्षा लोकांचे जीव महत्वाचे आहेत. मोदींना हे समजत नाही, असे नाही पण वळत नाही ही शोकांतिका आहे.

कोरोनीमुळे ज्यांच्या घरातील व्यक्ती मृत झाली ते कुटुंब यापुढे भाजपा अथवा मोदी यांना मत देणार का ते एकदा विचारा. गंगेत तरंगणारे प्रत्येक प्रेत आज बोलतय, मोदीजी सावधान…