खेळाने जीवन आणि संस्कृतीचा भाग बनावे

0
214

कोहिमा, दि.२३ (पीसीबी) : खेळ हे देशातील प्रत्येकाच्या जीवनाचा आणि संस्कृतीचा भाग बनायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी केले. रिजीजू यांच्या हस्ते खेलो इंडियाच्या देशातील पहिल्या आठ केंद्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी संवाद साधताना त्यांनी देशातील क्रीडा गुणवत्ता दुर्लक्षित राहणार नाही याची सरकार कायम काळजी घेईल असे सांगितले. ते म्हणाले,’देशातील क्रीडा गुणवत्ता ही केवळ पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दबली जात आहे. नेमके हेच टाळण्यासाठी सरकारने पावले उचलली असून, देशातील युवकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतरा आहे.’

खेलो इंडिया ही आता चळवळ बनली आहे. युवा खेळाडूंना या स्पर्धेने हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले असून, आता त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात येणारी क्रीडा नैपुण्यता केंद्र भावी खेळाडू घडवतील असा विश्वास व्यक्त करून रिजीजू म्हणाले,’ही क्रीडा नैपुण्यता केंद्र सरकार विविध राज्यांच्या साथीने सुरू करणार असून, भावी खेळाडू घडवणे हे या केंद्रांचे उद्दिष्ट राहणार आहे. या केंद्रांसाठी नेमकी मैदाने आणि मनुष्यबळ पुरविण्यासाठी क्रीडा मंत्रालयातून निश्चितच आर्थिक मदत केली जाईल. आपल्या खेळाडूंना अचूक मार्गदर्शन उपलब्ध करून देशाला क्रीडा जगतात ताकदवान बनविण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’ केंद्र सरकार आणि खेलो इंडियाच्या उपक्रमातंर्गत कर्नाटक, नागालॅंड, अरुणाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मिझोराम, ओडिशा आणि तेलंगणा येथे ही खेलो इंडिया क्रीडा नैपुण्यता केंद्र सुरू करण्यात आली आहेत.