Pune Gramin

खेडमध्ये कर्नलने जमिनीवर ताबा मिळवण्यासाठी वापरले शस्त्रधारी जवान; गुन्हा दाखल

By PCB Author

June 24, 2019

खेड, दि. २४ (पीसीबी) – तालुक्यातील गुळाणी येथे एका लष्करी कर्नलने जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी अपल्या अधिकाराचा गैरवापर करत तब्बल ३० ते ४० शस्त्रधारी जवानांचा वापर करुन जबरदस्ती जमिनीचा ताबा घेतला. गावात दहशत निर्माण केली. तसेच जमिनीत पेरलेल्या सोयाबीन पिकामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी करुन नुकसान केले.

याप्रकरणी मोनिका गणेश गाडे (रा. खालुब्रे ता खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कर्नल केदार विजय गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनिका गाडे आणि यांचे नांदावे सुनील नामदेव भरणे (रा. माण ता. मुळशी) यांनी गुळाणी येथील जमीन गट नंबर २४४ असलेली जमिन सन २०१८ मध्ये खरेदी केली होती. जमिनीच्या सातबाऱ्यावर देखील या दोघांची नावे आहेत. शनिवार (दि.२२) रोजी गुळाणी येथे कर्नल केदार गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून ३० ते ४० शस्त्रधारी जवानांना गावात आले. बेकायदा जमाव जमून दहशत निर्माण होईल असे कृत्य केले. त्यानंतर त्यांनी सदर जवानांसह गाडे आणि भरणे यांच्या मालकीच्या शेतात ट्रॅक्टर लावून शेतात लावलेल्या सोयाबीनचे नुकसान केले. याप्रकरणी कर्नल केदार गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस तपास करत आहेत.