खेडचे शिवसेना आमदार सुरेश गोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल

0
1890

चाकण, दि. २८ (पीसीबी) – अवैध वाहतुकीच्या प्रश्नांवर चाकणमध्ये केलेले आंदोलन शिवसेनेला चांगलेच महागात पडले आहे. रिक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवैध वाहतुकीमुळे वाहतूककोंडी होते. ती फोडण्यासाठी आमदार गोरे व त्यांचे १० ते १२ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आणि त्यांनी काही रिक्षांची तोडफोड केली होती.

याप्रकरणी चाकण पोलिसांत आमदार गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर मोशी ते चाकणपर्यंत प्रचंड वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. चाकणमध्ये एमआयडीसी असल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हजारो कामगार दरररोज या रस्त्यांनी ये-जा करत असतात. त्यातच या मार्गावर रिक्षांच्या गर्दीमुळे वाहतूककोंडी मोठी भर पडते.

ही वाहतूककोंडी फो़डण्यासाठी शिवसेनेचे खेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश गोरे हे रविवारी (दि. २६) स्वतः रस्त्यावर उतरले. तळेगाव चौकात आपल्या १० ते १२ कार्यकर्त्यांसह हातात लाठ्या-काठ्या घेऊन उतरल्यानंतर त्यांनी काही रिक्षांची तोडफोड केली. तसेच गुन्हा दाखल होऊ नये यासाठी रिक्षाचालकांवर दबाव टाकला. परंतु, एका रिक्षा चालकाने धाडस करत चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आमदार गोरे व त्यांच्या १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.