Pimpri

खून प्रकरणाशी संबंधित तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, विनयभंगचा गुन्हा दाखल

By PCB Author

June 17, 2020

पिंपरी, दि. 17 (पीसीबी): सांगवी येथील एका खून प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे सोशल मीडियावर बदनामी करणारे मेसेज, फोटो कोणी पोस्ट करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्‍त विनायक ढाकणे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खूनाची घटना घडली होती. या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या एका तरुणीचे फोटो आणि जातीय तणाव निर्माण होईल, अशा पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आल्या आहेत. आता या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्याकडे देण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याची बदनामी होईल, असे मेसेज कोणीही टाकू नयेत. धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण होईल, अशी वक्‍तव्य किंवा व्हिडिओ टाकू नयेत. सध्या सोशल मिडियावर पिंपरी चिंचवड सायबर सेलचे बारीक लक्ष आहे.

अशा प्रकारची पोस्ट फेसबुक, व्हॉटस्‌ अप, टिकटॉक, इंस्टाग्राम, ट्विटर किंवा इतर कोणत्याही ठिकाणी आढळून आल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्‍त विनायक ढाकणे यांनी दिला आहे.