खून, चकमक, जाळपोळ, दरोड्यातील जहाल नक्षलवादी सोमा चा खात्मा

0
423

गडचिरोली, दि. ४ (पीसीबी) – गडचिरोलीमधील येलदमडी जंगल परिसरात झालेल्या चकमकीत पेरमिली दलम कमांडर जहाल नक्षलवादी कोटे अभिलाष उर्फ चंदर उर्फ शंकर उर्फ सोमा (३६) ठार झाल्याची माहिती आज शनिवारी चौकशीत समोर आली आहे. दरम्यान सोमा याच्यावर आठ लाखाचे बक्षीस होते.

हेडरी उपविभागांतर्गत येणाऱ्या मौजा येलदमडी जंगलात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० कमांडोंनी उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत घातपाताच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांचे शिबिर उध्वस्त केले. त्यानंतर सी-६० पथकाने जंगल परिसरात शोध मोहिम राबविली असता एक हत्यार, दोन प्रेशर कुकर, वायर बंडल, २ वॉकीटॉकी, कॅमेरा फ्लॅश, २० पिट्टू व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त करण्यात आले. त्याच बरोबर एका पुरूष नक्षलवाद्याला ठार करण्यात यश आले होते. आज या नक्षलीची ओळख पटली आहे.

चकमकीत ठार झालेला नक्षलवादी पेरमिली दलम कमांडर कोटे अभिलाष उर्फ चंदर उर्फ शंकर उर्फ सोमा आहे. तो तेलंगण राज्यातील कारापल्ली जि. मुलुगु येथील रहिवासी आहे. २००८-२००९ मध्ये नक्षल दलममध्ये तो भरती झाला होता. २०१२-१३ पासून तो गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत होता. दरम्यान २०१८-१९ पासून पेरमिली दलम कमांडर म्हणून कार्यरत होता. सोमा उर्फ शंकर याच्यावर गडचिरोली पोलीस दलातील विविध पोलीस ठाण्यात १५ गुन्हे दाखल आहेत. यात खूनाचे ५, चकमक ५, विविध जाळपोळीचे ३, दरोडा १ असे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. शासनाने त्याच्यावर आठ लाखाचे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी या जहाल नक्षलवाद्याला कंठस्नान घालणाऱ्या सी-६० कमांडोजच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले असून रोख बक्षीस जाहीर केले आहे.

१२ कोटीचे बक्षीस असलेल्या ३४ नक्षलवाद्यांची यादी जाहीर
छत्तीसगड राज्याने नक्षलवाद्यांच्या विरोधात कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून ३४ मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यातील ३४ जहाल नक्षलवाद्यांवर एकूण १२ कोटींचे बक्षीस आहे. यामध्ये नक्षलवादी संघटनेचा सरचिटणीस नंबाला केशव उर्फ गंगन्ना, नक्षल संघटनेचा प्रमुख गणपती उर्फ मुप्पाला लक्ष्मणराव, मिलिंद तेलतुंबडे, मल्लोजुला वेणुगोपाल, संजीव उर्फ देवाजी, रामकृष्णा, कादरी सत्यनारायण, हरिभूषण उर्फ बालन्ना या प्रमुख नावांचा समावेश आहे.