Bhosari

खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या आरोपीस भोसरीतून अटक

By PCB Author

November 20, 2018

भोसरी, दि. २० (पीसीबी) – खूनाचा प्रयत्न करुन फरार झालेल्या एका सराईत आरोपीस गुन्हे शाखेच्या खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि.१९) भोसरी येथील शास्त्री चौक, वाचनालयाजवळ करण्यात आली.

शुभम उर्फ दाद्या सुभाष माने (वय २०, रा. साईनाथ कॉलनी, साईबाबा मंदिराजवळ, भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात कलम ३०७ अन्वये खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखेच्या खंडणी आणि दरोडा विरोधी पथक गस्त घालत होते. यावेळी पोलीस शिपाई नितीन खेसे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली कि, खूनाचा प्रयत्न करुन फरार असलेला आरोपी शुभम हा भोसरीतील शास्त्री चौकातील वाचनालयाजवळ उभा आहे. यावर पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन आरोपी शुभम उर्फ दाद्या याला अटक केली आणि भोसरी पोलिसांकडे सुपूर्द केले.

ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, महेश खांडे, किरण खेडकर, निशांत काळे, नितीन खेसे आणि विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने केली.