खुशखबर…भारतात कोरोनाचे १० कोटी डोस तयार

0
211

 

पुणे, दि. १५ (पीसीबी) – भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बातमी आली आहे. 2020 डिसेंबरच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीचे 10 कोटी डोस उपलब्ध होतील, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी शुक्रवारी दिली. सीरम इन्स्टिट्यूटने कोरोना लस निर्मितीबाबत जगातील पाच विविध संस्थांसोबत करार केले आहेत.

अदर पुनावाला यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, “गेल्या दोन महिन्यात अॅस्ट्राझेनका कंपनीच्या 4 कोटी लस तयार करण्यात आल्या आहेत. जर या लसीच्या अंतिम ट्रायलमध्ये कोरोना रुग्णांवर अपेक्षित परिणाम साधला गेला, तर केंद्र सरकारकडून डिसेंबरच्या अखेरपर्यंत त्याला मान्यता मिळवता येईल.”

ते पुढे म्हणाले की, “सुरुवातीला निर्मिती करण्यात येणाऱ्या लसीचे वाटप हे भारतात होईल आणि त्यांनंतरच्या काळात भारताबरोबरच दक्षिण आशियातील देशांत 50-50 या प्रमाणात लसीचे वाटप करण्यात येईल. गरीब राष्ट्रांना कोरोनाची ही लस उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे आणि या लसीसंदर्भात आगोदरच करार केला आहे.”

एका न्युज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अदर पुनावाला यांनी सांगितले की, “2024 पर्यंत ही लस सर्व जगात उपलब्ध होईल. परंतु या लसीची किंमत आणि याच्या निर्मितीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार कमी होण्यासाठी त्यानंतर दोन वर्षे लागण्याची शक्यता आहे.”

सुरुवातीच्या काळात या लसीची उपलब्धता ही गंभीर, गरजू रुग्ण आणि कोरोना योद्ध्यांना करण्यात यशस्वी होऊ असा अदर पुनावालांना विश्वास आहे. गुरुवारी सीरम इन्स्टिट्यूट आणि ICMR ने या लसीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी पूर्ण केल्याची घोषणा केली होती.

सध्या ICMR आणि सीरम इन्स्टिट्यूट भारतातील वेगवेगळ्या 15 ठिकाणी या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी चाचणी घेत आहेत. सीरम इन्सिट्यूट अमेरिकेतील ऑक्सफर्ड सोबत मिळून कोविशिल्डच्या लसीवर संशोधन करत आहे. अमेरिकेत तयार होत असलेल्या या लसीचा त्या देशासोबतच ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका या देशांत मोठ्या प्रमाणात ट्रायल घेण्यात येत आहे.