Pimpri

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात वर्षभरापासून फरार टायगर ग्रुपच्या रायगड जिल्हाध्यक्षाला चिंचवडमध्ये अटक

By PCB Author

June 22, 2021

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – मागील वर्षी नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांनी चिंचवड मध्ये अटक केली. अटक केलेला आरोपी हा टायगर ग्रुपचा रायगड जिल्हाध्यक्ष आहे.

निलेश रमेश चव्हाण (वय 30, रा. साक्षी पार्क -2 मालेवाडी स्टॉप, सुकापुर ता. पनवेल, जि. रायगड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार आशिष बोटके आणि प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, नवी मुंबईमधील कामोठे पोलीस ठाण्यात मागील वर्षी दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपी निलेश चव्हाण हा चिंचवड मधील क्विन्स टाऊन सोसायटी समोर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी त्याला सापळा लावून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर आरोपीला कामोठे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.