खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखेच्या पोलीसांनी केले अटक

0
726

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – तीन वर्षांपासून खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.३०) मावळातील कान्हेफाटा चौकात करण्यात आली.

चैतन्य उर्फ चेतन रंगनाथ येवले (वय ३१, रा. कान्हेवाडी, कमानीजवळ, ता.खेळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चाकण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस गस्तीवर असताना त्यांना त्यांच्या खबऱ्याने माहिती दिली कि, चाकण पोलीस ठाणे हद्दीतील खूनाच्या प्रकरणातील आरोपी चेतन येवले हा कान्हे फाटा येथे येणार असून त्याने काळ्या रंगाचे जर्किंग आणि निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातली आहे. यावर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने कान्हे फाटा चौकात सापळा रचून चेतन याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्या बाबत चाकण पोलिसांशी संपर्क साधून माहिती तपासली असता तो चाकण येथील एका खून प्रकरणात तीन वर्षांपासून फरार असल्याचे समजले. यावर युनिट दोनच्या पोलिसांनी चेतन याला पुढील कारवाईसाठी चाकण पोलीसांच्या ताब्यात दिले. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.