खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या रॅलीत सहभागी पोलिस निलंबित

0
313

पिंपरी,दि 31(पीसीबी) : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून शुक्रवारी सुटका झाली. त्यावेळी दुचाकी व चारचाकी वाहनातून रॅली काढणाऱ्यांना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. यामध्ये पिंपरी पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या कर्मचारीही होता. रॅलीतील मोटारीतून एक गावठी पिस्टल पाच जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर गुन्हे शाखेच्या त्या कर्मचाऱ्यास पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई यांनी निलंबित केले आहे.
शरीफ बबन मुलाणी (वय 36, रा. भोसरी) असे निलंबित करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुलानी हा गुन्हे शाखेच्या खंडणी/ दरोडा विरोधी पथकात होता. शुक्रवारी त्याची ड्युटी भोसरीमध्ये लावण्यात आली होती. मात्र कामाच्या ठिकाणी तो हजर न राहता खूनाच्या गुन्ह्यातील पॅरोलवर सुटलेल्या आरोपीचे स्वागत करण्यासाठी तो येरवडा कारागृह येथे गेला. आरोपीची सुटका झाल्यावर त्याची दुचाकी आणि चारचाकी वाहनातून रॅली काढण्यात आली होती.

विश्रांतवाडी पोलिसांनी ही रॅली अडवत सर्व वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये मुलानी बसलेल्या कारमध्ये एक गावठी पिस्टल आणि पाच जिवंत काढतूसे आढळून आली. यामुळे आझाद शेखलाल मुलाणी (वय 30, रा. चिखली), आदेश दिलीप ओकांडे (वय 21, रा. निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय 38 रा चिखली) संदीप किसन गरुड (वय 40 रा. तळेगाव दाभाडे) हुसेन जाफर मुलाणी (वय 43) सिराज राजू मुलाणी (वय 22), विनोद नारायण माने (वय 26, तिघेही रा. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी आरोपीला अटकही केली. पोलीस कर्मचारी सोमनाथ खळसोडे यांनी याबाबत फिर्याद दिली.

मुलानी हा कोणालाही न सांगत भोसरी येथे कर्तव्यावर असताना येरवडा कारागृह येथे गेला. खूनातील आरोपीच्या स्वागतासाठी रॅली काढली. बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगले व पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका पोलीस कर्मचारी शरीफ मुलानी याच्यावर ठेवला आहे. पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णाई यांनी मुलानी याला सेवेतून निलंबित केले आहे.