खुनाचा कट रचल्या प्रकरणात फरार भाजपाच्या माजी नगरसेवकला गुजरात बॉर्डरवरून अटक

0
246

पुणे, दि. 22 (पीसीबी): कुविख्यात गुन्हेगाराच्या खुनाचा कट रचल्या प्रकरणात फरार असलेला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भाजपाच्या माजी नगरसेवक विवेक यादव याला कोंढवा पोलिसांनी गुजरात बॉर्डरवरून अटक केली आहे. यापूर्वी खुनाची सुपारी घेणाऱ्या दोन किलरला अटक केली आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी या खुनाचा कट उधळत किलर राजन जॉन राजमनी (वय 38, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) व इब्राहिम उर्फ हुसेन याकुब शेख (वय 27, रा.वाकड) यांना अटक केली होती.

विवेक यादव हा भाजपचे लष्कर कॅन्टोमेंटचे माजी नगरसेवक आहे. दरम्यान 2016 मध्ये यादव याच्यावर गणेशोत्सव काळात रात्री गोळीबार झाला होता. हा गोळीबार सराईत गुन्हेगार बबलू गवळी याने केला होता. या दोघांमध्ये पूर्ववैमनस्य आहे. त्यातून हा गोळीबार झाला होता. या गोळीबाराचा आणि दुष्मनीतून विवेक यादव याने या दोघांना बबलू गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्याला कुठे व कशा पद्धतीने ठार मारायचे हे देखील ठरले होते. त्याबाबत कॉल आणि चॅटिंगद्वारे या दोघांचे बोलणे झाले होते.

दरम्यान, बबलू गवळी कोरोनाच्या जामिनावर कारागृहा बाहेर आहे. त्याला या काळात ठार मारायचे होते. पण, ही माहिती पोलिसांना मिळाली व   खुनापूर्वीच हा कट उधळला गेला. किलरकडून 3 पिस्तुल व 7 काडतुसे असा साठा जप्त केला होता.

दरम्यान, विवेक यादव व त्याचा साथीदार पसार होते. या दोघांचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. तीन वेगवेगळी पथके आणि गुन्हे शाखा त्याचा तपास सुरू होता. मात्र, तो सापडत नव्हता. दरम्यान, कोंढवा पोलिसांच्या पथकाला विवेक यादव हा गुजरातला असल्याची माहिती मिळाली. या पथकाने येथे धाव घेत त्याला बॉर्डरवरून पकडले आहे. त्याला पुण्यात आणले जात आहे. दरम्यान, अद्याप देखील विवेक यादव याचा साथीदार आणि पिस्तुल पुरवणारा सापडलेला नाही. त्याचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे, हवालदार योगेश कुंभार , पोलीस नाईक सुशील धिवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विवेक यादवला अटक केली आहे.