खा.डॉ. अमोल कोल्हे यांना प्राईम पॉइंट फाऊंडेशनचा ‘संसदरत्न पुरस्कार’ जाहीर

0
836

–  मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवृत्त न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शनिवारी वितरण सोहळा

पुणे, दि.१७ (पीसीबी) : संसदेतील कामगिरी विचारात घेऊन चेन्नई येथील प्राईम पॉइंट फाऊंडेशन आणि इ – मॅगेझीनतर्फे देण्यात येणारा संसद रत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे यांना जाहीर झाला आहे. देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए.के.पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार शनिवारी (दि.२०) प्रदान करण्यात येणार आहे.

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे संसद रत्न पुरस्कार दिला जातो. संसदेतील अधिवेशनातील उपस्थिती, चर्चासत्रातील सहभाग आणि उपस्थित केलेल्या प्रश्न इत्यादी निकषांवर पुरस्कारासाठी खासदारांची निवड केली जाते. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के.श्रीनिवासन यांनी कळविले आहे. विद्यमान सतराव्या लोकसभेमध्ये पदार्पणातच खा.डॉ.कोल्हे यांना पहिला संसद रत्न पुरस्कार मिळणार आहे.

चालू सतराव्या लोकसभेत खा.डॉ.कोल्हे यांनी लोकसभेच्या सभागृहातील १४ चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी आतापर्यंत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांसह लोकोपयोगी विषयांवर एकूण २७७ प्रश्न उपस्थित केले. अल्पावधीतच खा.कोल्हे यांनी संसदेत उल्लेखनीय कामगिरी केली असून प्रभावी भाषणांद्वारे छाप पाडत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे, बैलगाडा शर्यत, राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्राची स्थापनेचा विषय मार्गी लावला. तर कोरोना काळात परदेशात अडकलेल्या शेकडो विद्यार्थी व पर्यटकांना पुन्हा भारतात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. यासोबतच अॅलोपथी, आयुर्वेद, युनानीसह सर्व पॅथींचा इंटिग्रेटेड विचार करण्याचा मुद्दा मांडताना केलेले अभ्यासपूर्ण भाषण देखील गाजले होते. विविध लोकोपयोगी विषयांसोबत शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संसदेत वेळोवेळी आवाज उठविला. त्यांची गेल्या दोन वर्षांमधील संसदेतील कामगिरी विचारात घेऊन देशपातळीवर प्रतिष्ठीत असा संसद रत्न पुरस्कार देण्यात येणार असल्यामुळे सर्व स्तरांमध्ये त्यांचे कौतुक केले जात आहे.